Friday, June 17, 2011

लोखंडी तारांमुळे घरटय़ातील पिल्लांना धोका?

प्रशांत सिनकर १६ जून

मुंबई : आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे घरातील बरंचसं अडगळीचं सामान कचराकुंडीत टाकलं जातं. परंतु या सामानात लोखंडी तारा किंवा पातळ टोकदार वस्तू तर नाही ना याची दक्षता घेणं गरजेचं आहे. कारण अशा वस्तूंपासून पक्ष्यांनी तयार केलेले घरटं त्यांच्यासाठी घातक ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे घरातील बारीकसारीकसामान बाहेर फेकताना कोणता पक्षी ते उचलून नेणार नाही अशा पद्धतीने टाकावं. त्याचप्रमाणे रस्त्यांवर किंवा गृहसंकुलातील आवारात सुकलेल्या काटक्या, गवताच्या काटय़ा टाकाव्यात की जेणेकरून पक्ष्यांचं घरटं सुरक्षित राहून त्यांची संख्याही वाढेल.

पावसाळ्याअगोदरच पक्ष्यांनी घरटी तयार केलेली असतात आणि या घरटय़ांमध्ये पिल्लांसमवेत ते राहत असले, तरी पावसाळ्यात घरटय़ाला त्रास होऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुकलेल्या काटक्या, गवत इत्यादी सामग्री घेऊन ते आपलं गृहकुल सजवतात. मात्र असं निदर्शनास आलं आहे की, कावळा, घार, घुबड असे काही पक्षी झाडांच्या काटक्यांऐवजी लोखंडी तारांसारख्या वस्तूही घरटं बांधण्यासाठी चोचीतून नेतात. मात्र तारांसारख्या वस्तू पक्ष्यांसाठी घातक ठरत आहेत. घरटं विणताना या तारांचं टोक काही वेळा पक्ष्यांच्या पोटात घुसून गंभीर इजा होते. त्यात ते मरून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुंबई-ठाण्यातील निसर्ग हरवला आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकू येणं कठीण होऊन गेलं आहे. झाडं तोडून तिथे क्राँक्रिटची जंगलं उभी राहिल्यामुळे पक्ष्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे घरटी तयार करताना या घरटय़ामधील लोखंडी तारा लागून पक्षी दगावण्याचंही कारण असल्याची माहिती पक्षीमित्र नितीन वाल्मिकी यांनी दिली. माणसाअगोदर पक्ष्यांना पावसाची चाहूल लागते, असं पक्षीनिरीक्षणादरम्यान आढळून आलं आहे. पक्ष्यांची आपणच काळजी घेतली नाही तर भविष्यात मुंबईतील अनेक पक्षी दृष्टीस पडणार नाहीत. त्यामुळे घरांची साफसफाई करताना त्यातील लोखंडी तारा, वायरींगच्या ताराअशा वस्तू काळजीपूर्वक बाहेर टाकाव्यात, की जेणेकरून कोणताही पक्षी घरटं बांधण्यासाठी अशा वस्तू चोचीतून उचलून नेणार नाहीत. याउलट झाडांच्या सुकलेल्या काटक्या किंवा गवताच्या काडय़ा रस्त्यावर टाकून द्याव्यात की जेणेकरून पक्षी या काटय़ा उचलून घरटं बांधण्यासाठी घेऊन जातील.

घरावर येणाऱ्या फांद्या तोडताना सावधान!

पावसाळ्यात सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक वेळा झाडांच्या फांद्या तुटून त्या घरावर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्याच्या अगोदर फांद्यांची छाटणी करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु झाडांची फांदी तोडताना या फांद्यांवर कोणत्या पक्ष्याचं घरटं नाही ना, याचीही काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. या घरटय़ामंध्ये पक्ष्यांची पिल्लं असण्याची शक्यता असते. पक्षी मोठय़ा मेहनतीने घरटी बनवतात. काही पक्ष्यांची घरटीही बघण्यासासखी असतात. झाडांची फांदी तोडण्याअगोदर त्या फांदीवर एखादं घरटं वाचवता येईल का? हा विचार करून नंतरच फांद्यांची छाटणी करावी, असं आवाहन पक्षीमित्रांनी केलं आहे.